Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसचे समोरील टायर फुटल्याने बस अनियंत्रत होऊन उलटली. बस पलटी होऊन समोर असणाऱ्या दुभाजकाला थकल्याने डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि बसला भीषण आग लागून २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
सुरुवातीला या अपघातात २५ जण मृत्युमुखी झाल्याची माहिती समोर आली होती मात्र आता अपघातातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता, की बसमधील प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. दरम्यान, मृतांपैकी चार प्रवाशांची ओळख पटली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या बसमधून वर्ध्यामधील १४, नागपूरमधील ८ आणि यवतमाळचे ३ प्रवाशी प्रवास करीत होते, अशी माहिती समोर आली आहे. यातील अवंती पोहनकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, आणि श्रेया वंजारी या ४ मृतांची ओळख पटली आहे. हे चारही जण वर्धा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अद्यापही अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातात प्रवाशांच्या मृतदेहाचा कोळसा झाल्याने ओळख पटवणे कठीण जात आहे.
तर जखमी प्रवाशांमध्ये चालक शेख दानीश शेख इस्माईल (रा. दारव्हा जि. यवतमाळ), क्लिनर संदिप मारोती राठोड (वय ३१, रा. तिवसा), योगेश रामराव गवई (रा. औरंगाबाद), साईनाथ धरमसिंग पवार (वय १९ रा. माहूर), शशिकांत रामकृष्ण गजभिये ( रा. पांढरकवडा यवतमाळ), पंकज रमेशचंद्र ( रा. जिल्हा कांगडा, हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे. इतर दोन जखमी प्रवाशीचे नाव कळू शकले नाही.