Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे नागपूरहून पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत एका बाळाचाही जळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अपघातानंतर आजूबाजूने जाणारी वाहनेही मदतीसाठी थांबली नाहीत. यावेळी ट्रक, टेम्पो चालक थांबले असते, त्यांनी आपल्याकडील लोखंडी रॉडने काचा फोडण्यास मदत केली असती, तर मृतांचा आकडा कमी झाला असता, असा दावा काही जणांनी केला आहे. बसच्या मागील बाजूला एक महिला आपल्या बाळासह काचेवर हात आपटत सुटकेची याचना करत होती, मात्र आमच्या डोळ्यांदेखतच त्यांचा जळून कोळसा झाल्याचे एकाने सांगितले. ही संपूर्ण घटना मन हलावणारी आहे. या अपघातमध्ये लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे.
५ लाख रुपयांची मदत जाहीर
या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेह नातेवाईंकडे सोपवले जाणार आहेत. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिसमधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्नशील आहेत. तसेच अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचे मोबाईल देखील जळून खाक झाले असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय किंवा आप्तांशी संपर्क होणे कठीण होत आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळमधील प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.