पुणे : बजेट ओलांडणार आठ हजार कोटींचा टप्पा

"स्थायी'चे अंदाजपत्रक दि. 1 मार्च रोजी होणार सादर

 

पुणे – महापालिका स्थायी समितीचे 2021-22 या आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दि.1 मार्च रोजी सादर होणार आहे. समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे अंदाजपत्रक सादर करतील. मागील वर्षभर करोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत खुंटल्याने समिती अध्यक्ष जमा-खर्चाचा ताळमेळ कसा बसवणार, यावर शहर विकासाची दिशा ठरणार आहे.

 

 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीच या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना 7 हजार 700 कोटींचा टप्पा गाठल्याने स्थायी समिती अध्यक्षांचे अंदाजपत्रक 8 हजार कोटींवर जाण्याची चर्चा आहे. महापालिकेचे मागील आर्थिक वर्षच करोनाच्या संकटात सुरू झाले होते. त्यानंतर आता करोना संकट संपताना नव्याने बाधितांचा आकडा लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा आर्थिक संकट घोंगावत आहे. अशा परिस्थितीत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आपले दुसरे अंदाजपत्रक सादर करतील.

 

 

मागील आर्थिक वर्षात शासनाकडून जीएसटी अनुदान आणि मिळकतकर यातूनच जवळपास 3,500 कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. तर इतर महसूलापोटी 500 ते 800 कोटी महापालिकेस अपेक्षित आहेत.त्यामुळे जेमतेम 4,200 ते 4,300 कोटींचा महसूल मिळणार असतानाही मागील आयुक्तांच्या अंदाजपत्रकापेक्षा यंदा आयुक्तांचे अंदाजपत्रक सुमारे 1,400 कोटींनी फुगवले आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षही त्यात तब्बल 500 ते 800 कोटींची वाढ करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

पुणेकरांवर सवलतीचा पाऊस

आगामी वर्षात महापालिकेच्या निवडणुका असल्याने पुणेकरांवर या अंदाजपत्रकात सवलतींचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात वेगवेगळ्या सवलती, अभय योजना तसेच इतर वैद्यकीय योजनांचा समावेश असण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपने मिळकतकरात सरसकट 15 टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातही अशा अनेक योजनांचा समावेश असण्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.