ठेकेदारधार्जिणे प्रशासन – सहा महिन्यांपासून औषध टंचाई असतानाही
पिंपरी – मागील सहा महिन्यांपासून महापालिका रुग्णालयांमध्ये औषध टंचाईची ओरड होत असताना प्रशासनाचा ठेकेदारधार्जिणा कारभार सुरू आहे. औषध पुरवठा करणाऱ्या एजन्सीला मुदतवाढ मिळावी यासाठी निवडणूक आचारसंहितेच्या तोंडावर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे तरतुदीपेक्षा 20 लाखांचा वाढीव खर्च करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. विशेष म्हणजे याच एजन्सीला पूर्वीही 45 लाखांचा वाढीव खर्च अदा करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती औषध भांडार विभागामार्फत करण्यात येतो. तथापी, मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडून औषध व साहित्य पुरवठा न झाल्यास तातडीने खरेदीसाठी महापालिकेने 50 लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. 9 ऑगस्ट 2017 ते 8 ऑगस्ट 2019 अशा दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही तरतूद आहे.
महापालिकेने त्यासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेतून मेसर्स कोठारी मेडिकल ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दवाखाने व रुग्णालयांच्या मागणीनुसार तातडीने आवश्यक ब्रॅंडेड औषध, जेनेरिक औषध, सर्जिकल साहित्य खरेदी केले जाते. दरम्यान, निविदा कालावधीत मार्च 2019 अखेर 50 लाख रुपयापर्यंतचा खर्च झाला. त्यामुळे पुढील पाच महिन्यांसाठी महापालिकेने या एजन्सीला 45 लाख रुपयांचा वाढीव खर्च देण्यास मंजुरी दिली. वास्तविकतः या एजन्सीची मुदत ऑगस्ट महिन्यामध्ये संपत असताना त्यापूर्वीच महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून एजन्सी निश्चित करणे गरजेचे होते.
दरम्यान, महापालिकेत मुख्य आरोग्य अधिकारी पदाचा वाद उफाळून आला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार काढून घेतले. या सर्व गोंधळात निविदा प्रक्रियेस विलंब झाला. त्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर आला. निवडणुकीनंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. परंतु, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निविदा मागविण्यात आल्या. मात्र, आचारसंहितेमुळे निविदा मंजुरी रखडली आहे. एकीकडे निविदा प्रक्रिया राबविण्यास दिरंगाई होत असताना दुसरीकडे कोठारी मेडिकल यांना मुदतवाढ देण्याचा आयत्यावेळचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत प्रशासनाने घाईघाईने मंजूर करुन घेतला. त्यावर महापालिकेला 20 लाखांचा वाढीव खर्च करावा लागणार आहे.
भांडार विभागामार्फत औषध खरेदी केली जाते. आचारसंहितेचा अडसर नको म्हणून तातडीने औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या रुग्णालयात पुरेसा औषध व शस्त्रक्रिया साठा आहे, अशी माहिती डॉ. पवन साळवे, (अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी) यांनी दिली.