सांगली -घरातील कामे करण्यासाठी फरशीवर डोके आपटून व मारहाण करून सुहाना ख्वाजासाहेब मोमीन (वय 13) हिचा खून करण्यात आला. वाळवा येथील श्रमिक वसाहतीत गुरुवारी ही घटना घडली. याप्रकरणी सावत्र आई आसमा ख्वाजासाहेब मोमीन व वडील ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना आष्टा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान काम करण्याच्या कारणातून सुहानाला बुधवारी रात्री बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे तिच्या तोंडाला व बरगड्यांना सूज आली होती. तिची त्वचा काळी पडली होती. या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला असावे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. गुरुवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली व खुनाचा प्रकार समोर आला. साधारण दोन वर्षांपूर्वी सुहानाच्या आईचे निधन झाले होते. यानंतर तिला पलूस येथील मुस्लिम धार्मिक शाळेत दाखल केले होते. मात्र, सावत्र आईला घरात कामात मदत करण्यासाठी तिला पुन्हा वाळवा येथील घरी आणण्यात आले.
सुरूवातीपासूनच सावत्र आई मुलीला अमानुष त्रास देत असे. घरातील धुणी, भांडी इतर कामे तिच्याकडून करून घेत असे. तसेच तिला जेवणदेखील जात नसे. आजूबाजूचे लोक तिला खायला देत असत. वेळोवेळी शेजारील लोक, नातेवाईक या दाम्पत्याला समजवण्याचा प्रयत्न करत. मात्र, काही ऐकून न घेता उलट त्यांना दम देत “आमची मुलगी आहे. आम्ही काहीही करू,’ असे सांगितले जात होते. खून प्रकरणी सावत्र आई आणि वडील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आष्टा पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.