‘बुम बॅरिअर’ रोखणार बीआरटीतील घुसखोरी

पीएमपी प्रशासनाचा निर्णय : अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

पुणे – बीआरटी मार्गातून अनेक खासगी वाहने घुसखोरी करतात. यामुळे अनेकदा अपघात घडण्याची शक्‍यता असते. वारंवार येथे असणाऱ्या वॉर्डनने सांगून देखील वाहनचालक दाद देत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. ही घुसखोरी रोखण्यासाठी सर्व बीआरटी स्थानकांवर ऑटोमॅटिक तंत्रज्ञान असलेले “बुम बॅरिअर’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहारातील 5 मार्गांवर बीआरटी अर्थात “बस रॅपिड ट्रान्झिट’ सुरू केले आहे. पीएमपी बसेसच्या माध्यमातून याठिकाणी सेवा दिली जाते. मात्र, मार्गावरील खासगी वाहनांची घुसखोरी वाहतुकीचा वेग मंदावून अनेकदा अपघात घडतात. हे रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने बीआरटी स्थानकांवर वॉर्डनची नेमणूक केली आहे. परंतु, तरीदेखील यावर नियंत्रण येत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाने बीआरटी स्थानकांवर “बुम बॅरिअर’ बसवण्याचे ठरवले आहे. टोल नाक्‍यावर अशाप्रकारचे ऑटोमॅटिक “बुम बॅरिअर’ बसवण्यात येतात.

बुधवारी पीएमपी कार्यालयात बीआरटी देखभाल समितीची बैठक झाली. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

बसेसला टॅग लावणार
बुम बॅरिअर संदर्भातील प्रस्ताव महापालिकेकडे पाठवण्यात येणार असून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. बीआरटी स्थानकावरून ये-जा करणाऱ्या बसेसला एक टॅग बसवला जाईल. हा टॅग असलेली बस स्थानकात प्रवेश करताना बॅरिअर खुले होईल. तर, बसस्थानकातून पुढे गेल्यानंतर बॅरिअर आपोआप बंद होईल. यामुळे इतर खासगी वाहनांना बीआरटी स्थानकातून जाता येणार नाही.

बीआरटी स्थानकांवर खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी “बुम बॅरिअर’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी घेण्यात येईल.
– अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.