भारतीय हॉकी संघांची सुवर्ण कामगिरी

पुरूष आणि महिला संघाने कमावले सुवर्णपदक

टोकियो: ऑलिम्पिक सराव स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला हॉकी संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. ारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी न्यूझीलंडवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवून विजेतेपद पटकावले. या विजयामुळे भारतीय संघाने स्पर्धेतील राऊंड रॉबिन फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा वचपादेखील काढला. त्याचवेळी भारताच्या महिला संघानेही सुवर्ण पदक जिंकताना अटीतटीच्या लढतीत जपानचा 2-1 असा पराभव केला.
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात उभय संघांच्या खेळाडूंनी मध्यरेषेजवळ खेळण्यावर अधिक भर दिला. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल होऊ शकला नाही. कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करून सातव्या मिनिटाला खाते उघडले. शमशेर सिंगने 18 व्या मिनिटाला गोल करून आघाडी दुप्पट केली. त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात झटपट तीन गोल झाले. निलकांत शर्माने 22व्या मिनिटाला, गुरसाहबजीतसिंगने 26 व्या आणि मनदीपसिंगने 27 व्या मिनिटाला गोल करीत भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकवली. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही.

तर तिकडे भारताच्या महिलांनी आपला चमकदार खेळ कायम राखताना अंतिम सामन्यात जपानला 2-1 असे नमविले. नवज्योत कौरने 11व्या मिनिटाला, तर लालरेमसियामी हिने 33व्या मिनिटाला गोल करत भारताच्या सुवर्ण पदकामध्ये मोलाचे योगदान दिले. मिनामी शिमिजू हिने जपानकडून 12 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. आक्रमक सुरुवात केलेल्या भारताला हळूहळू जपानकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. भारताच्या बचावफळीनेही अप्रतिम कामगिरी करत जपानी आक्रमण परतावले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)