पुणे: शैक्षणिक संधी आणि सांस्कृतिक संबंधांसाठीच्या युनायटेड किंग्डमच्या ब्रिटीश कौन्सिल ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने महाराष्ट्र सरकारसोबत सफल शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी केलेल्या भागीदारीला आज दहा वर्षे पूर्ण झाली असून वर्ष 2012 ते 2021 दरम्यान सुमारे दोन हजार मास्टर ट्रेनर्स आणि एक लाख 46 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे या प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील सरकारी शाळांमधील 4.38 लाख विद्यार्थ्यांना झाला, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
वर्षा गायकवाड आणि ब्रिटीश काउंसिलचे पश्चिम भारत संचालक डॉ. योवन इलिक ह्यांच्या उपस्थितीत ही दशकपूर्ती साजरी करण्यात आली. त्यामध्ये दहा वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापनही करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये या उपक्रमांत राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या टाटा ट्रस्टसह विविध संस्थांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र सरकारने चार जिल्हास्तरीय प्रकल्पांची सुरुवात केली होती व त्याचे उद्दिष्ट राज्यातील सरकारी शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या इंग्रजी प्रभूत्वामध्ये सुधारणा करणे हे होते. इंग्रजी भाषा प्रशिक्षण व अध्यापनशास्त्राच्या आपल्या व्यापक अनुभवाच्या आधारे ब्रिटीश काउंसिलने ह्या चार प्रकल्पांचे वैशिष्ट्यपूर्ण आरेखन केले व ते राबवले.
याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या अध्ययन दर्जामध्ये व शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे व ह्या उद्देशाच्या दिशेने ब्रिटीश कौन्सिलने सादर केलेला अहवाल पाहता, इंग्रजी शिक्षणाचा आमचा हेतू सफल झाल्याचे दिसून येते. “इंग्लिश फॉर ऑल मुंबई’ अशा उपमांमुळे शिक्षकांच्या योग्यतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे व त्यामुळे दर वर्षी आपल्या विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळाले आहे.
ब्रिटीश कौन्सिलचे पश्चिम भारतचे संचालक डॉ. योवन इलिक म्हणाले की, राज्यातील सरकारी शाळांमधील इंग्रजी प्रभूत्वाच्या स्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी आमच्या विविध प्रकल्पांद्वारे शालेय शिक्षण प्रणालीला सहाय्य करता आले. तसेच प्रथम शिक्षकांचा दर्जा अधिक प्रगल्भ झाल्याने विद्यार्थ्यांना विषय समजणे अधिक सोपे गेले.