रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाची बातमी आतापर्यंत अनेकवेळा चर्चेला आली होती. पण दरवेळी काही ना काही कारणामुळे ही अफवा ठरली होती. कधी ऋषी कपूर यांचे आजारपण, कधी करोनाची साथ तर कधी लॉकडाऊनमुळे हे लग्नाचे नियोजन बारगळले होते. मात्र, आता याचवर्षी डिसेंबरमध्ये यांचे लग्न होणार आहे, असे समजले आहे. दिवाळी जवळ आली आणि वेडिंग सीझनही सुरू झाला आहे.
त्याबरोबर लव्ह बर्डसचा किलबिलाट सुरू झाला आहे. या दोघांच्या वेडिंग डेस्टिनेशनचीही निश्चिती झाली आहे, असे समजते आहे. इटलीमध्ये लग्न करण्याचे यांचे नियोजन आहे. या लग्नाच्या संकेतांमुळेच या दोघांच्या शूटिंगचे नियोजनही बदलले गेले आहे.
“ब्रह्मास्त्र’च्या शूटिंगनंतर रणबीर “ऍनिमल’मध्ये काम करणार होता. मात्र, या सिनेमाचे शूटिंग पुढच्यावर्षी जानेवारीपर्यंत पुढे ढकलले गेले आहे. “ऍनिमल’मध्ये रणबीर कपूर बरोबर परिणिती चोप्रा, अनिल कपूर आणि बॉबी देओल असणार आहेत. आलियाकडे सध्या बऱ्याच असाईनमेंट आहेत. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत ती या सर्व सिनेमांचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती स्वतःला मोकळी ठेवणार आहे.