रावणगाव – दौंड येथील मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण विभाग जिल्हा परिषद, पुणे आणि पंचायत समिती, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दौंड तालुका विज्ञान प्रदर्शनात खडकी (ता. दौंड) येथील ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक, तर शिक्षकांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे प्रदर्शन 13 व 14 डिसेंबरला पार पडले. खडकी (ता. दौंड) येथे 2019-20 मध्ये स्थापन झालेल्या ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूलने पहिल्याच वर्षी या प्रदर्शनात यश संपादन केले.
या शाळेचा सातवीचा विद्यार्थी सिध्देश धायतोंडे आणि निरंजन ढवळे यांनी ड्रेनेज क्लिनिंगसाठी बनवलेल्या जेसीबी मशीन या प्रकल्पाचा तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आला, तसेच गणितीय प्रतिकृती बनवण्यामध्ये याच शाळेच्या शिक्षिका रेशमा आटोळे यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला.
त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू गायकवाड व खजिनदार तुषार काळे आणि मुख्याध्यापक पांडुरंग काळभोर यांनी यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षिकांचे अभिनंदन केले.