‘देशातील वातावरण कलुषित करण्यास सर्व पक्ष कारणीभूत’

14 हल्ल्यांनंतर मिळालेले बोनस आयुष्य देशाच्या शांतीसाठी : एम. एस. बिट्टा


हैदराबाद येथे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांचाही सत्कार करणार

सातारा -“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रभक्त होते, मी त्यांना सलाम करतो. प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका, मते वेगळी असली तरी देशातील वातावरण कलुषित होण्यास सर्वच राजकीय पक्ष कारणीभूत आहेत. माझ्यावर आतापर्यंत 14 हल्ले झाले असून मी बोनस जीवन जगत आहे. देशात शांतीसाठी माझे सुरू असलेले प्रयत्न मी मरेपर्यंत थांबवणार नाही,’ असे मत दहशतवादविरोधी अभियानाचे प्रमुख एम. एस. बिट्टा यांनी व्यक्त केले.

बालन फाउंडेशन, परिवर्तन सामाजिक संस्था यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी एम. एस. बिट्टा साताऱ्यात आले होते. कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बिट्टा म्हणाले, “भारत लोकशाहीप्रधान देश असून येथे सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, मात्र असे होताना दिसत नाही. राजकारणाचे स्वरुप बदलत असल्याने देशात वातावरण दूषित होण्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब देशाच्या अखंडतेसाठी धोकादायक आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रभक्त होते. याबाबत प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका असल्याने या मुद्द्यावरुन देशातील वातावरण कलुषित होत आहे, ही बाब गंभीर असून सर्वच राजकीय पक्षांनी विचार करून देशहितासाठी काम करणे गरजेचे आहे. अखंड हिंदुस्तान हे माझे स्वप्न असून पंजाब दशहतवादमुक्त करणे हे माझे ध्येय होते. मी कधी राजकारण करत नाही.
सामाजिक काम करताना देशात सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने राहिले पाहिजेत. शांती प्रस्थापित होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. माझ्यावर एवढे हल्ले झाले आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी मला देशासाठी सोडले आहे.’ हैदराबाद येथे झालेल्या घटनेनंतर संशयितांचे एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा हैदराबाद येथे जाऊन सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी देशातील विविध विषयांवर भाष्य केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.