पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जमिनीच्या व्यवहारात फसवणूक प्रकरणात सहायक पोलीस आयुक्तांच्या वतीने पाच लाख रुपयांच्या मागणी करुन एक लाख रुपये स्वीकारताना एका खासगी व्यक्तीस अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ३२ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार ओंकार भरत जाधव (32, रा. वाकड ) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जहाॅंगीर रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध कात्रज-कोंढवा बायपास येथील जागेसंदर्भात सहायक पोलीस आयुक्त ( देहुरोड विभाग, पिंपरी-चिंचवड) यांच्याकडे एक तक्रार अर्ज आला होता. त्याची चौकशी सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे सुरू होती. अर्जामध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी पाच रुपये लाचेची मागणी मुगुटलाल पाटील यांच्या सूचनेवरून जाधव याने केली.
यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तडजोडीअंती एक लाखाची लाच स्वीकारताना ओंकार जाधव यास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, सहायक पोलीस फौजदार मुकुंद अयाचित, पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, दिनेश माने यांच्या पथकाने केली