पोलिसांत तक्रार दाखल; राजकीय विरोधातून केलेले कृत्य
आंबेगाव बुद्रुक – नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे महामार्गालगत सेल्फी पॉइंट म्हणून विकसित करण्यात आलेल्या छोट्याशा गार्डनमधील आय लव्ह नऱ्हे या विद्युत फलकाची मोडतोड बुधवारी (दि.23) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांनी केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य जयश्री सागर भूमकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेत वापरण्यात आलेल्या दुचाकींचे नंबर मिळाले असून त्यावरून संबंधित तरुणांचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नऱ्हे येथे जिल्हा परिषद सदस्य भूमकर यांच्या विशेष निधीतून महामार्गालगत गार्डन तसेच विद्युत रोषणाईचा फलक तयार करण्यात आला आहे. महानगरपालिका हद्दीलगतची 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. यामध्ये नऱ्हे गावाचाही समावेश आहे. राजकीय वर्चस्वाच्या तसेच राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी ही तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या चार तरुणांपैकी एकाने दगड मारत या फलकाची तोडफोड केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष दिले असल्याचे भूमकर यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेत गावाचा समावेश झाल्यानंतर काही राजकीय असंतुष्टांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. गाव पालिकेत गेल्यानंतर आमचे पद जाणार, अशा विचारातूनच हे कृत्य विरोधकांनी केले आहे. या घटनेतून तर आम्हाला आणखी बळ मिळाले आहे. गावासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू.
– जयश्री भूमकर, जिल्हा परिषद सदस्य
जिल्हा परिषद निधीतून सुशोभित करण्यात आलेल्या गार्डनमधील फलकाची विरोधकांनी तोडफोड केली असली तरी माझ्या मनात असणारे नऱ्हे गावाबद्दलचे प्रेम ते तोडू शकत नाहीत. यापुढेही नऱ्हे गावाच्या विकासासाठी आणखी प्रयत्नशील राहील.
– सागर भूमकर, उपसरपंच, नऱ्हे