औरंगाबाद – वनरक्षक भरती परीक्षेतील उमेदवारांना मोबाईलवरून उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटचा औरंगाबाद पोलिसांनी भांडाफोड केला आहे. शहरातील सुंदरवाडी भागातील शिवराणा करिअर अकॅडमीत छापा मारून पोलिसांनी एकाला गजाआड केले. अकॅडमी चालकासह त्याचे अन्य सहकारी मात्र फरार झाले.
औरंगाबादमध्ये शिवराणा करिअर अकॅडमी आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून विनोद डोभाळ, सचिन गोमलाडू यासह अन्य एक व्यक्ती हायटेक यंत्रणेद्वारे परीक्षार्थीला उत्तरे पुरवत होती. पोलिसांना याचा सुगावा लागताच छापा टाकण्यात आला. या कारवाईची कुणकुण लागताच दोघेजण पसार झाले असून विनोद डोभाळ पोलिसांच्या हाती लागला आहे.
पोलिसांच्या तपासात उमेदवाराकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना मोबाईलद्वारे उत्तरे सांगितली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच उत्तरे सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ही टोळी किती जणांना उत्तरे सांगत होती. याचा तपास पोलीस करत आहेत.
सचिन गोलमाडू हा मुख्य सुत्रधार असून तो शिवराणा करिअर अकॅडमीचा संचालक आहे. यापूर्वी देखील त्याला पाच ते सहा वेळा अशाच प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, जामिनावर सुटताच पुन्हा त्यांनी हा धंदा सुरू केला.
ही सगळी मंडळी नागपूरमध्ये बसलेल्या एका परीक्षार्थीला उत्तर देत होती. पोलीस या सगळ्या प्रकरणात वनखात्याच्या देखील संपर्कात असून हा परीक्षार्थी कोण याचाही शोध घेत आहेत.दरम्यान, आता वनरक्षक भरतीचा घोटाळा समोर आल्याने परीक्षार्थींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.