मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस पाठवली असून येत्या 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘मला याची कल्पना नाही. माझ्यापर्यंत यासंदर्भात काहीही माहिती आलेली नाही. जर घरी नोटीस आलेली असेल, तर मी स्वत: पत्रकार परिषद आयोजित करून याबाबत माहिती देईन,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईडी सारख्या यंत्रणा मागे लावत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी केला होता. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरजही राऊत यांनी व्यक्त केली होती.
याआधी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली होती. तसेच, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला देखील ईडीने नोटीस पाठवली होती. आता संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे.