नवी दिल्ली – सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला सूज तसेच रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना तातडीने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांना अनेक दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी जग्गी वासुदेव यांना डोकेदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे डॉ. विनीत सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जग्गी वासुदेव यांच्यावर उपचार केले जात आहेत. जग्गी वासुदेव यांचा त्रास पाहून डॉक्टरांनी त्यांना एमआरआय करण्याचा सल्ला दिला.
यावेळी त्यांच्या मेंदूला मोठी सूज आल्याचे तपासात समोर आले. तसेच त्यांच्या मेंदूत रक्तस्रावही होत असल्याचे एमआयआयमध्ये दिसून आले. अशा स्थितीत डॉक्टरांना त्यांच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली.