पुणे – एजीएएस स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ब्राह्मण क्रिकेट लीग स्पर्धेत बियास ब्राव्होज् आणि कृष्णा लेजंडस् संघांनी अनुक्रमे मुठा सह्यांद्री शिलेदार आणि वशिष्ठी ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्लॅटिनम स्पोर्ट्स क्लब, वाडे बोल्हाई येथील मैदानावर झालेल्या सामन्यात नचिकेत कुलकर्णी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कृष्णा लेजंड्स संघाने वशिष्ठी ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनचा ३ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना वशिष्ठी ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनने १४७ धावा धावफलकावर लावल्या. भुषण देशपांडे (४३ धावा) आणि अनिल मांडके (३२ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. नचिकेत कुलकर्णी याने १८ धावात ३ गडी बाद करून वशिष्ठी संघाच्या डावाला वेसण घातली.
कृष्णा लेजंडस् संघाने हे लक्ष्य १८.५ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. किरण दातार याने ४१ धावा, संकेत जोशी याने २९ धावा आणि प्रतिक देशपांडे याने २० धावांचे योगदान देत संघाला विजय साकार केला. केतन बापट याच्या स्फोटक ९३ धावांच्या जोरावर बियास ब्राव्होज् संघाने मुठा सह्यांद्री शिलेदार संघाचा ३८ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना बियास ब्राव्होज् संघाने १८४ धावांचा डोंगर उभा केला. केतन बापट याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकारांसह ९३ धावांची स्फोटक खेळी केली. या आव्हानासमोर मुठा सह्यांद्री शिलेदार संघाचा डाव १४६ धावांवर मर्यादित राहीला. शिलेदार संघाकडून क्षितीज आपटे (३३ धावा), सचिन कांगरकर (२९ धावा) आणि प्रितीष कुलकर्णी (२५ धावा) यांनी प्रतिकार केला.