World Test Championship Points Table 2023-25 : न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 281धावांनी पराभव केला. या विजयासह, न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे.
जागतिक कसोटी (World Test Championship) चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत न्यूझीलंड संघाने पहिले स्थान मिळवले आहे. तर किवी संघाच्या विजयाने भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघाचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेवर 281 धावांनी शानदार विजय मिळवून न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत 2023-25 मध्ये अव्वल स्थान पटकावले.
माजी कसोटी चॅम्पियन्सने माऊंट मौनगानुई येथील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करून पुढील वर्षी त्यांच्या दुसऱ्या अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यता बळकट केली आहे. किवींनी मागील WTC मधील उपविजेता भारतासह ऑस्ट्रेलिया यांना मागे टाकून अव्वल स्थान मिळवले. न्यूझीलंडची गुणांची टक्केवारी 66.66 आहे.
NZ vs SA 1st Test : न्यूझीलंडचा दुसरा सर्वात मोठा विजय, द. आफ्रिकेचा ‘इतक्या’ धावांनी केला पराभव…
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिका
1. न्यूझीलंड (66.66 गुणांची टक्केवारी)
2. आॅस्ट्रेलिया (55.0 गुणांची टक्केवारी)
3. भारत (52.77 गुणांची टक्केवारी)
4. बांगलादेश (50.0 गुणांची टक्केवारी)
5. पाकिस्तान (36.66 गुणांची टक्केवारी)
6. वेस्टइंडिज (33.33 गुणांची टक्केवारी)
7. द. आफ्रिका (33.33 गुणांची टक्केवारी)
8. इंग्लंड (25.0 गुणांची टक्केवारी)
9. श्रीलंका (0.0 गुणांची टक्केवारी)
सध्याच्या WTC सायकलमध्ये न्यूझीलंडने केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली आणि दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला. उभय संघांमधील पहिली कसोटी संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानावर, तर भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेची सातव्या स्थानावर घसरण झाली. तर बांगलादेश चौथ्या, पाकिस्तान पाचव्या आणि वेस्ट इंडिज सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने 10 पैकी 6 सामने तर भारताने 6 पैकी 3 सामने जिंकले.