चेतक क्लब उपविजेता : मंचर येथे कबड्डीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले
मंचर -येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत चिखली येथील ब्रह्मा-विष्णू-महेश संघाने बालेवाडी येथील चेतक स्पोर्टस क्लब संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले, तर चेतक क्लबला उपविजेतपदावर सामाधान मानावे लागले. मात्र, रोमहर्षक झालेल्या या सामन्याने कबड्डी प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील महाराणा प्रताप संस्थेच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, महाराणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष सचिन बाणखेले उपस्थित होते.
दरम्यान, स्पर्धेत नारायणगाव येथील अतुल बेनके विचारमंच आणि मंचर येथील महाराणा प्रताप संस्थेच्या संघाने अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक प्रदान करण्यात आले.
जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलेल्या महाराणा प्रताप संस्थेचे खेळाडू व प्रशिक्षक संभाजी काळे, प्रदीप भेके यांना मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी पांडुरंग निघोट, बापूसाहेब चासकर, क्रीडा प्रशिक्षक संजय डोके यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
पाहुण्यांचे स्वागत रमेश खरमाळे यांनी, प्रास्ताविक युवराज बाणखेले, सूत्रसंचालन बाळासाहेब खानदेशे, प्रकाश थोरात यांनी, तर लक्ष्मण थोरात यांनी आभार मानले.
मंचर येथील क्रीडा संकुलात विविध सुविधा खेळाडूंसाठी सरकारच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कबड्डी खेळाडूंसाठी लवकरच या संकुलात अत्याधुनिक मॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे.
– दिलीप वळसे पाटील, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री