अमरावती – प्रेयसीने दुसऱ्यासोबत साखरपुडा केल्यामुळे प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रहाटगाव परिसरात घडली आहे. अनुभव धाकडे (वय – 33, राहणार रमाबाई आंबेडकरनगर, अमरावती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरूणाने आत्महत्या केलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली आहे. चिठ्ठीबरोबरच आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुभव धाकडे याचे परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची ओळख होती. हे दोघे रहाटगावनजीक असलेल्या एका शेतात भेटत असत. त्यांनी एकमेकांना लग्नाचे वचनही दिले होते.
लग्नही करणार होते. मात्र अचानक प्रेयसीने दुसऱ्यासोबत साखरपुडा केल्याची माहिती समजल्याने तो दु:खी झाला. त्यानंतर त्याने ज्याझाडाखाली ते रोज भेटायचे त्याच ठिकाणी झाडाला गळफास लावून आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माझ्या आत्महत्येला माझी प्रेयसी जबाबदार असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.
तु फक्त माझ्या पैशाचा वापर केला…
आत्महत्या करण्यापूर्वी तरूणाने चिठ्ठीत लिहिले आहे की, “त्या रात्री माझ्या घरचे झोपल्यानंतर तू मला येऊन भेटली. तेव्हा तू मला घट्ट मिठी मारून रडत होतीस. तेव्हा मी तुला सोडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तरीही तू समजत नव्हती. तुझा साखरपुडा होण्याच्या आधी मी तुझ्या पप्पांना फोन करून सर्व सांगितले होते.
परंतु तुझे पप्पा तुला फाशी द्यायची धमकी देऊन तुझा विचार बदलला. त्यानंतर माझ्यावर बलात्काराची केस करत होते. परंतु तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…”