मेलबर्न – भारतीय क्रिकेट संघ येत्या डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येत असून या दोन संघातील कसोटी मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामना परंपरेप्रमाणे मेलबर्नवरच व्हावा, अशी अपेक्षा महान गोलंदाज व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शेन वॉर्न याने व्यक्त केली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून होणारी बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्न मैदानावरच खेळवण्यात यावी, अशी मागणीही त्याने केली आहे. सध्या व्हिक्टोरिया शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने ही कसोटी मेलबर्नऐवजी अन्य ठिकाणी खेळवण्याचा विचार करत आहे.
ऑस्ट्रेलियातील क्रिकेट क्षेत्रात 26 डिसेंबर हा दिवस बॉक्सिंग डे म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी शंभर वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचे आयोजन मेलबर्न मैदानावरच होते. या मालिकेतील एक कसोटी सामना प्रकाशझोतातही खेळविण्यात यावा, अशी मागणीही त्याने केली आहे.