पुणे -शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामावरून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मागील आठवड्यात मलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलेले असतानाच; सोमवारी आयुक्तांनी जंगली महाराज रस्त्यावर केलेल्या पाहणीत पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरची सफाईच गेले अनेक महिने झालेली नसल्याचा प्रकार समोर आला.
या वरून आयुक्तांनी परिमंडळ उपायुक्त तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, पुढील आठ दिवसात तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, परिमंडळ उपायुक्त संतोष वारूळे, विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जबाबदारी नेमकी कोणाची ?
दरम्यान, जंगली महाराज रस्ता हा 12 मीटरपेक्षा अधिक रूंद असल्याने त्याची जबाबदारी मुख्य खात्याकडे असल्यामुळे त्यांनीच हे काम करणे अपेक्षित आहे. मात्र, हा रस्ता प्रकल्प विभागाने तयार केला असून त्यांच्याकडूनच पावसाळी वाहिन्या तसेच इतर पाण्याचे नियोजन करण्यात आले. तर 12 मीटरपेक्षा कमी रस्त्यांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. त्यामुळे हे चेंबर नेमके कोणी साफ करायचे यावरून वाद आहेत. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने सातत्याने हा झाडांचा कचरा या पावसाळी चेंबरमध्ये जातो. आता पावसाळा जवळ येऊन ठेपला तरी गेल्या वर्षभरात या रस्त्याचे काम झाले नसल्याचे या पाहणीनंतर समोर आले आहे.
चेंबरच चुकीच्या जागेवर
दरम्यान, जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन रस्त्यावर अर्बन स्ट्रीट प्रोग्रॅमअंतर्गत पदपथ आणि रस्ते विकसित करण्यात आले आहेत. फर्ग्युसन रस्ता चढावर असून जंगली महाराज रस्ता उतारावर आहे. परिणामी, पावसाचे पाणी फर्ग्युसन रस्त्यावरून आपटे रस्ता आणि आपटे रस्ता व घोले रस्त्यावरून जंगली महाराज रस्त्यावर येते. आपटे रस्त्याकडून येणारे जोड रस्ते जिथे जंगली महाराज रस्त्याला जोडले जातात, तिथे चढ असून चढावर पावसाळी चेंबर आहेत. त्यामुळे आपटे रस्ता आणि जंगली महाराज रस्त्याच्या मधला भाग खोल झाला आहे. तर जंगली महाराज रस्त्यावर अनेक पादचारी मार्ग आडवे गेले असल्याने रस्त्यात पाणी साचत आहे.