राहुरी – गुहा येथील कानिफनाथ महाराज मंदिराबाबत कायदेशीर मार्गाने पर्याय काढण्यासाठी दोन्ही समाजाने समन्वयाची भूमिका घ्यावी. गुहा ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत. मात्र, मुस्लिम समाजाकडून पुन्हा अन्याय झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी दिला.
गुहा येथील कानिफनाथ देवस्थान मंदिर येथे माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते आज (गुरुवार) महाआरती झाली. त्या वेळी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. कर्डिले म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा महान आहे. पखवाज, टाळ, मृदंग यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, त्याची अवहेलना सहन केली जाऊ शकत नाही. आता मंदिराच्या नावे असलेल्या गट नंबरमध्ये नवीन मशिदीचे बांधकाम कसे झाले असा प्रश्न उपस्थित करून उर्वरित राहिलेले 32 एकर क्षेत्र या ठिकाणी जुनी मस्जिद आहे.
तेथे मुस्लिम समाजाने त्यांचे धार्मिक कार्यक्रम करावेत. इतर ठिकाणी हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी सांगितले. गुहा येथील कानिफनाथ देवस्थान अतिक्रमणमुक्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पार पाडून निर्णय घ्यावा. दोन्ही समाजाने समन्वयाची भूमिका घ्यावी. पुन्हा या ठिकाणी अन्याय झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा कर्डिले यांनी दिला. कानिफनाथ देवस्थानबाबत कायदेशीर प्रक्रियेला आपण स्वतः जशी वारकरी संप्रदायाच्या मोर्चाला आर्थिक मदत केली तशी यापुढेही करू, असे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांतर्फे माजी आ. कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, नामदेव ढोकणे, दत्तात्रय ढुस, संचालक रवींद्र म्हसे, सर्जेराव घाडगे, नानासाहेब गागरे, शहाजी कदम, के. मा. कोळसे, बबन कोळसे, राजेंद्र कोळसे, किरण कोळसे, अनिल आढाव, गणेश खैरे, दिपक वाबळे, नारायण धनवट, राजेंद्र गोपाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.