शिक्रापूर (प्रतिनिधी) : कासारी ता. शिरूर येथील एका पंचेचाळीस वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असताना आरोग्य विभागाने ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कातील सात जणांचे स्बॅव तपासणीसाठी घेतले असताना ‘त्या’ सात जणांपैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कासारी (ता. शिरूर) येथील पंचेचाळीस वर्षीय इसमाला काही त्रास होऊ लागल्याने त्या इसमाला तळेगाव ढमढेरे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथील डॉक्टरांना त्या इसमामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्याची कोरोना तपासणी केली असता सदर इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनतर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने सदर इसम राहत असलेल्या परिसरात फवारणी करत निर्जंतुकीकरण करण्यात आले होते, तर आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सदर व्यक्तीच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील सात जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले होते.
त्यांनतर सदर व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले असता ‘त्या’ सात जणांपैकी त्या इसमाच्या वडील व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कासारी येथे एकाच घरातील तिघांना तसेच अन्य दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून गावामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच झाली आहे. कासारी सारख्या लहान गावामध्ये देखील कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.