सव्वाशे वर्षांत प्रथमच आली आयोजकांवर नामुष्की
बोस्टन –जागतिक मॅरेथॉनच्या गेल्या जवळपास सव्वाशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रसिद्ध बोस्टन मॅरेथॉन रद्द करावी लागण्याची नामुष्कीदेखील आयोजकांवर आली आहे.
मॅरेथॉनची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जगभरात अनेक देशांनी या स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले आहे. मात्र, त्यात सर्वात जास्त प्रतिष्ठा याच मॅरेथॉनला मिळाली. अव्याहतपणे ही स्पर्धा जवळपास सव्वाशे वर्षे सुरू आहे. दोन महायुद्धाच्या काळातही या स्पर्धेत खंड पडलेला नव्हता. मात्र, करोनाशी लढा वाढत गेल्याने व हा धोका कायम असल्याने यंदा ही स्पर्धा रद्द करावी लागत असल्याचे शहराच्या महापौरांनी सांगितले.
ही स्पर्धा मुळ वेळापत्रकानुसार एप्रिलमध्ये होणार होती परंतू करोनाचा धोका वाढल्याने स्पर्धा सप्टेंबरपर्यंत लाबणीवर टाकण्यात आली होती. आता तर त्यातही बदल करण्यात आला असून यंदाची स्पर्धा रद्दच करण्यात आली आहे. या स्पर्धेत केवळ अमेरिका खंडातीलच नव्हे तर जगभरातील अनेक देशांचे स्पर्धक सहभागी होत असतात. तसेच स्पर्धा पाहण्यासाठीही लाखो प्रेक्षक जमा होतात. त्यामुळे या सर्वांचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून यंदा स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
स्पर्धेचे प्रायोजक जरी स्पर्धा आयोजित व्हावी यासाठी पाठिंबा देत असले तरी यंदाच्या संपूर्ण वर्षात ही स्पर्धा घेऊन विनाकारण लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.