पुणे – लोढा समितीच्या नियमानुसार सौरव गांगुली यांना येत्या जुलैअखेर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची चिन्हे असताना त्याच्यासाठी घटनेत बदल करण्याची तसेच त्याचा कार्यकाळ वाढविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट नंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदापासून दूर होत आयसीसीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी गांगुलीच अनुत्सुक असल्याची माहिती मंडळाच्याच एका सूत्राने दिली आहे.
गागुंली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हाच त्यांचा कार्यकाळ केवळ 9 महिनेच राहील हे स्पष्ट झाले होते. लोढा समितीच्या नियमानुसार एखाद्या संघटनेचे पद तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे एखाद्याने उपभोगले असेल तर त्याला कुलींग ऑफ कालावधी घ्यावाच लागतो. बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्षपद तीन वर्षांपेक्षाही जास्त काळ गागुंलीकडे होते. त्यावेळी बीसीसीआयची निवडणूक होणार होती व त्यात गांगुली यांना अध्यक्षपदाची संधी चालून आल्याने त्यांनी कॅबच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व गेल्या ऑक्टोबरअखेर बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यामुळे येत्या जुलैमध्ये त्यांची मुदत संपुष्टात येणार आहे. हीच मुदतवाढ मिळावी व अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहावे यासाठी बीसीसीआयच्या एका सदस्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून गांगुली यांच्यासाठी बीसीसीआयच्या घटनेत बदल करण्याची परवानगी देखील मागितली आहे. करोनाच्या धोक्यामुळे न्यायालयीन कामकाज सध्या बंद असल्याने ही याचिका दाखल करून घेतली आहे किंवा नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
या सर्व बाबतीत पुढील महिन्याभरात सर्व चित्र स्पष्ट होईल. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद हातात असताना आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची मानसिकता सध्यातरी गागुंली यांनी दाखवलेली नाही, त्यामुळे आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेल्या शशांक मनोहर यांची मुदत जरी संपत असली तरी त्यासाठी गांगुली यांच्याकडून कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत. अशा स्थितीत आयसीसीची निवडणूक जरी जाहीर झाली तरी त्यात गांगुली सहभागी होणार नाहीत, अशी माहितीही या सूत्रांनी दिली आहे.
कॅबच्या सदस्याला करोना..
करोनाचा शिरकाव आता भारतीय क्रिकेटमध्येही झाल्याचे समोर आले आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे व निवड समितीत एक सदस्य सागरमॉय सेनशर्मा यांना करोनाची लागण झाली आहे. चाचणीतून ही बाब समोर आली असून त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कुटुंबातील अन्य सदस्यांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.