मुंबई – “भारा विस्कटलेला आहे. पेंढ्या वेगळ्या झाल्या आहेत. जे कुणालाही जमले नाही, ते ऐतिहासिक काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पवारांना मोडणारा नेता, या महाराष्ट्रात जन्मल्याचे अवघ्या राज्याने पाहिले आहे,’ असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडाळीनंतर शरद पवार महाराष्ट्रभर दौरे काढून पक्ष बांधणीचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर खोत यांनी पुन्हा एकदा पवारांवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे.
खोत यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चाणक्य म्हणून केला होता. तसेच पवारांच्या वाड्याला हादरा देण्याचे काम त्यांनी केल्याचे नमूद करत शरद पवारांबद्दल आक्षेपाहार्य शब्दाचा वापर केला होता. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा खोत यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट करत पुन्हा एकदा पवारांवर शरसंधान साधले आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
शरद पवारांचा खूप मोठा दरारा होता. अनेक मोठ्या संस्थांवर तेच प्रमुख असायचे. त्यांचा एवढा दरारा होता की, किती माणसे गायब झाली असतील याचा कोणताही पत्ता नाही. माझ्याकडे खूप मोठी यादी आहे. त्यांनी कोणत्या व कशा संस्था घेतल्या, कसे कुणाला दाबले, याची यादी माझ्याकडे असून, ती वेळ आल्यानंतर बाहेर काढेन, असे सदाभाऊ खोत म्हणाले.