मानधन वाढीस मंजुरी मिळाल्याने मिळाले 34 डॉक्टर
पुणे – महापालिकेचे दवाखाने आणि रुग्णालयांसाठी पुरेसे डॉक्टर नसल्याने, तसेच बंधपत्रित डॉक्टरांना पालिकेकडून देण्यात येणारे मानधन राज्य शासनाच्या तुलनेत कमी असल्याने पालिकेस आवश्यक डॉक्टर उपलब्ध होत नव्हते. मात्र, हे मानधन 52 हजारांहून थेट 72 हजार रुपये केल्याने अवघ्या महिनाभरात तब्बल 34 डॉक्टर दाखल झाले आहेत.
नव्याने नियुक्त झालेल्या या डॉक्टरांकडे पालिकेच्या दवाखान्यांचा पदभार देण्यात आला आहे. पालिकेकडे असलेल्या डॉक्टरांची संख्या कमी असल्याने दररोज दवाखाने बंद ठेवण्याची वेळ येत होती. शहरात महापालिकेचे 49 दवाखाने, 17 प्रसृतिगृहे, 4 सर्वसाधारण रुग्णालये आहेत. त्या माध्यमातून 40 लाख पुणेकरांना आरोग्य सेवा पुरवली जाते. यासाठी 124 स्पेशलिस्ट, तर 220 एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र, स्पेशलिस्टची तब्बल 100, तर एमबीबीएसची सुमारे 57 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे तगादा लावण्यात आला आहे.
मात्र, शासनाकडून पालिकेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात येत आहेत. दुसरीकडे राज्य शासनाच्या सेवेत बंधपत्रित डॉक्टरांना 72 हजारांचे मानधन मिळत असताना; महापालिकेकडून केवळ 52 हजारांचे मानधन दिले जात होते. त्यामुळे अनेकदा बंधपत्रिक डॉक्टर पालिकेत येण्यास तयार होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने या हे मानधन 72 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यास स्थायी समितीने 15 जानेवारीला मान्यता दिली होती. त्यानंतर गेल्या महिनाभरात सुमारे 34 डॉक्टर रुजू होण्यासाठी आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या दवाखान्यांसाठी डॉक्टरांची संख्या वाढणार असून, पुढील काही दिवसांत आणखी संख्या वाढेल. त्यामुळे पुरेसे आरोग्य सेवेचा दर्जा वाढण्यासही मदत होणार आहे.