राज्य शासनाच्या निर्णयानंतर प्रश्न आणि चर्चा जोरात
पुणे – राज्य शासनाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. मात्र, याचा लाभ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार का? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
राज्य शासनाने बुधवारी परिपत्रकाद्वारे शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. सुट्टी देत असतानाच पंचेचाळीस मिनिटांनी रोज कामाच्या वेळामध्ये वाढ केली आहे. दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही हा नियम लागू होणार का? असा प्रश्न बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे. कारण बोर्डाचा प्रशासकीय कारभार केंद्र शासनाच्या कार्यकक्षेत येतो. तर वेतनश्रेणी राज्य शासनाच्या नियमानुसार देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचा नियम या कर्मचाऱ्यांना लागू होणार का, अशी चर्चा बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात रंगली आहे.
दरम्यान, बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. याबाबत अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.