नागरिकांना दहा लाखांमध्ये मिळणार घर

प्राधिकरणाच्या घरांसाठी पुढील महिन्यात अर्ज उपलब्ध होणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पात एक हजार घरांचे आरसीसी बांधकाम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी 2021 उजाडणार आहे. तथापि, गृहप्रकल्पाची “रेरा’ अंतर्गत नोंदणी झाल्यानंतर चालू वर्षी मार्च आणि एप्रिलपर्यंत प्रकल्पातील घरांसाठी अर्ज मागविले जाणार आहेत. या गृहप्रकल्पात सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या दहा लाख रुपयांमध्ये घर मिळणार आहे.

पेठ क्रमांक 12 मधील एकूण 52 हेक्‍टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्‍टर क्षेत्रावर गृहयोजना साकारते आहे. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील नागरिकांना 3 हजार 317 सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 566 सदनिका उभारल्या जाणार आहेत. प्रकल्पातील वन बीएचके सदनिका 9.90 लाखापर्यंत उपलब्ध होणार आहे. गृहप्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत आहे. येथील प्रकल्प-1 साठी 240 कोटी तर, प्रकल्प-2 साठी 267 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या वन बीएचके सदनिकेचे कार्पेट क्षेत्र 317.53 चौरस फूट इतके असणार आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 2 बीएचके सदनिकेचे कार्पेट क्षेत्र 317.53 चौरस फूट इतके असणार आहे. या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत अनुदान मिळणार आहे.

पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पाचे काम 2021 मध्ये पूर्ण होणार आहे. सध्या एक हजार घरांचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील वन बीएचके सदनिका 9.90 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे.
– प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण.


पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पाची “रेरा’ अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथील घरांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. साधारण मार्च व एप्रिल महिन्यात हे अर्ज मागविण्यात येतील.
– आशाराणी पाटील, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.