पुस्तक परीक्षण : पारंब्याचा झुला

Madhuvan

शर्मिला जगताप

“पारंब्याचा झुला’ असे काव्यात्म नाव धारण केलेल्या या संग्रहात तीनेक प्रमुख जाणीवसूत्रे आहेत. ही सारी कविता एका अंतःसूत्राने एकत्रित बांधली गेलेली आहे. आरंभीची पारंब्याचा झुला ही कविता आणि शेवटची कविता देव्हारा या कवितेदरम्यान विविधरंगी भावविश्‍वाचे बंध बांधले गेले आहेत.

भूतकाळातील व्याकूळ स्मरणरमणीयतेचे संवेदन या दोन कवितांमध्ये आहे. भूतकाळातील संचितापासून आपण अलग झाल्याची व्याकूळ गतकातरता तीमध्ये आहे. गतकाळातील सुसंगत रचितापासून आपण निरवळून पडल्याची जाणीव आहे. “गाव सोडुनिया आलो दूर दूर’ आल्याची भावना आहे. त्या आधीच्या भावकेंद्रात विसावा होता, आनंद होता. काळजाची माया त्यात गुंतलेली होती.

बालपणीचा रम्य गाव व त्याच्या साजिवंत आठवणीचं फक्‍त आता त्याच्याजवळ आहेत. कारण आता तो त्याच्यापासून दूर आलेला आहे. या दोन कवितांच्या मधोमध या बदललेल्या जगाबद्दलची संवेदना व्यक्‍त झाली आहे. या कवितेतील दुसरे सूत्र म्हणजे या बदललेल्या जगाबद्दलची संवेदना, आपल्या भोवतालच्या जगाबद्दलच्या आत्मपर स्वरूपाच्या प्रतिक्रिया, अभिप्राय या सूत्रामध्ये आहेत.

व्यक्‍तिगत व सामाजिक स्वरूपाच्या भावसंवेदना या जाणिवेत आहेत. यातला जो निवेदक आहे तो या नव्या जगात विखुरलेला आहे. त्याच्या एकसंधपणाला तडे गेलेले आहेत. बदललेल्या जगातील दुभंग व्यक्‍तीची जाणीव या काव्यविश्‍वात आहे.

या कवितेतील जाणीवविश्‍वाच्या रचिताचा एक विशेष म्हणजे या कवितेतील जाणिवांना कवीने जीवनातील फार छोट्या छोट्या अनुभवबिंदूंनी आकार प्राप्त करून दिला आहे. कुटुंबजीवनातील बारीक सारीक घटनांनी, कृतींनी हे भावविश्‍व आकाराला आलेले आहे. मातृरूपात व स्त्रीरूपात वैभव पाहण्याची दृष्टी तीमध्ये आहे. अंगणात एकतरी झाड ठेवण्याची असोशी आहे.

कुटुंबसंवेदनाच्या जगाचा मोठा भाग या कवितेने व्यापलेला आहे. या जीवनसंबंधीच्या अनेकविध जाणिवा या कवितेतून प्रकटल्या आहेत. एकंदरीतच भूतकाळातील रम्य हव्या हव्याशा भावकेंद्रापासून दुरावलेल्या, विखुरलेल्या स्वप्नातील माळरानाच्या शोधयात्रेवरील ही कविता आहे. प्रकाश गव्हाणे यांच्या काव्यमनाने हा कवितासंग्रह गुंफला आहे.

या काव्यसंग्रहातील सर्व कविता आपल्या मनाला चिंब भिजवितात. या काव्यसंग्रहातून एकप्रकारे जगण्याची कला शिकवलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.