शरद पवारांच्या पावसातील सभेची आज वर्षपूर्ती

राष्ट्रवादीने महामार्गावर उभारले फलक, ऐतिहासिक सभेच्या आठवणीला उजाळा

सातारा ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेला रविवारी एक  वर्ष पूर्ण होत आहे . या घटनेचे स्मरण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्गावर आनेवाडी टोलनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या दरम्यान पवारांच्या सभेचे फलक लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून येऊनही केवळ शरद पवारांच्या चाणाक्ष रणनीतीमुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला सत्तेपासून दूर रहावे लागले. पवारांनी काँग्रेस व शिवसेना या दोन विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणले .

मात्र या सत्ताबदलाचा क्लायमॅक्स रंगला तो साताऱ्यातील सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर . ऐंशी वर्षाच्या शरद पवारांनी भाजप विरूद्ध दंड थोपटत आपल्या घणाघाती सभांनी महाराष्ट्र पिंजून काढला व साताऱ्यात झालेल्या ऐतिहासिक सभेत पवारांनी  पावसात भिजत सातारकरांना चूक दुरूस्त करायची गळ घातली . सातारकरांनी पवारांच्या विनंतीला मान देत लोकसभेच्या पोटनिवडणूकीत उदयनराजें ऐवजी राष्ट्रवादीचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील यांना पसंती दिली.

महाराष्ट्रातील या सत्ताबदलाची व पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील सभेची देशभर चर्चा झाली . रविवारी १८ ऑक्टोबर रोजी या ऐतिहासिक सभेला एक वर्ष पूर्ण होत आहे . या विजयाची आठवण म्हणून महामार्गावर सातारा जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आनेवाडी टोलनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते सात किलोमीटरच्या टप्प्यात पवारांच्या सभेचे मोठमोठे बॅनर उभारले. राष्ट्रवादीच्या या बॅनरबाजीची साताऱ्यात जोरदार चर्चा झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.