मराठा आरक्षणासाठी आता शिवनेरी ते दिल्ली धडक मोर्चा 

अकोले  -सकल मराठा समाजाच्या 58 मोर्चांच्या फलिताला एक महिनाभरात जर न्याय मिळाला नाही, तर शिवनेरी ते दिल्ली असाच धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य संपर्कप्रमुख व मराठी मराठा शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला.
अकोले तालुक्‍यातील सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला.

प्रारंभी महात्मा फुले चौकात सर्व मराठा व इतर समाजांचे नागरिक जमा झाले. तेथून सकाळी दहा वाजता धडक मोर्चाला सुरुवात झाली. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा, लाख मराठा, या व अन्य घोषणा देत आंदोलक बाजार तळावर आले. तेथे सभा झाली. त्यावेळी दहातोंडे बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. व्यासपीठावर माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, मधुकरराव नवले, शिवाजीराव धुमाळ उपस्थित होते.

दहातोंडे यांनी दुर्दैवाने प्रस्थापित मराठा व विस्थापित मराठा, अशी समाजाची विभागणी झाली आहे. साखरसम्राट मराठ्यांना आरक्षण नको आहे. त्यामुळे हा तिढा वाढला आहे, असा आरोप केला. महिन्याभरात मराठा आरक्षणाचा निकाल लागला नाही, तर शिवनेरी ते दिल्ली असा सर्व सकल मराठा समाजाचा मोर्चा काढला जाईल आणि प्रसंगी संसद भवनाला घेराव घातला जाईल, असा इशारा दिला.

गायकर यांनी शेतमालाला यापूर्वी योग्य भाव दिला गेला असता, तर आज शेतकरी समाज सुखी, समृद्ध झाला असता. तसेच या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्‌द्‌याने उचल खाल्ली नसती. सत्तेत असणाऱ्यांना भविष्यात मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास राज्य करता येणार नाही, असा खणखणीत इशारा दिला. केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात चांगला वकील देवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा. त्याचबरोबर आदिवासी समाज, मराठा समाज, अठरापगड जातीचे लोक तालुक्‍यामध्ये हातात हात घालून काम करतात, याकडे लक्ष वेधले.

शिवाजी धुमाळ यांनी झारीतले शुक्राचार्य हे मराठा समाजातले असून, तेच आरक्षण मिळू देण्यात अडसर निर्माण करीत आहे, असा आरोप केला.कोल्हापूर आणि सातारच्या गादीवर कोण व्यक्ती बसला आहे, यापेक्षा त्या गादीशी आम्ही नतमस्तक आहोत आणि आमच्या राजाला नाव ठेवायला तुम्हाला कोणी अधिकार दिला? अशा प्रवृत्तींचा मी निषेध करतो. त्यामुळे पिंडीवरचे विंचू हे ठेचले पाहिजेत, असे म्हणत गुणवंत सदावर्ते व प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणासाठी केंद्राने कायदा करावा आणि राज्यानेही पंतप्रधानांशी चर्चा करून हा प्रश्‍न निकाली काढावा, अशी मागणी केली.

मधुकर नवले व डॉ. अजित नवले, कारभारी उगले, जालिंदर वाकचौरे, वसंत मनकर, महेश नवले, डॉ. संदीप कडलग, अनिकेत चौधरी, रेश्‍मा गोडसे, अनिल जोर्वेकर, अशोक आरोटे, सुरेश नवले, श्रावण गोडसे, दीपक महाराज देशमुख, भानुदास पाटील तिकांडे, सीताराम भांगरे, बाळासाहेब नाईकवाडी, महेश नवले, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख, मच्छिंद्र धुमाळ आदींची यावेळी भाषणे झाली.

अनेक वक्‍त्यांनी विविध मुद्दे मांडून आरक्षण मिळावे, अशी मागणी केली. मराठा समाजातील नेत्यांनी आरक्षण मिळवून दिले नाही. पण देवेंद्र फडणीस यांनी हे काम केले, अशा प्रकारचा युक्तिवाद या वेळेस केला गेला. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. आभार अमोल वैद्य यांनी मानले. यावेळी युवतींनी तहसीलदारांना निवेदन दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.