पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे बॅंकेच्या डिजिटल बॅंकिंग सेवांना नवीन आयाम देण्यासाठी फिनटेक महोत्सव 1 एप्रीलपासून 13 एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या दरम्यान बॅंकिंग सेवा अखंडपणे पुरवता येण्यासाठी बॅंकिंग क्षेत्रात विविध वित्तीय तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने देऊ करणाऱ्या अनेक कंपन्यांना सल्लामसलत व चर्चा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी आठ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव होते. यावेळी कार्यकारी संचालक ए बी विजयकुमार व आशिष पांडेय यांचेसह वरीष्ट अधिकारी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा व्यापक स्तरावर स्वीकार करण्यास बॅंक ऑफ महाराष्ट्र सज्ज असल्याचे प्रतिपादन ए एस राजीव यांनी कार्यक्रमाला संबोधन करताना केले. सार्वजनिक बॅंकांमधील तंत्रज्ञानातील तफावत दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सक्रीय पाऊले उचलली असून डिजिटल ठसे विस्तारित करण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये घडून आलेले बदल लक्षणीय असून डिजिटल सेवांचा स्वीकार करून बॅंकिंग सेवा अधिक सुलभ करण्यात बॅंक ऑफ महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असेल असा विश्वास विजयकुमार यांनी व्यक्त केला.
बॅंकेच्या डिजिटल उपक्रमाचे सारत्थ्य करीत असलेले बॅंकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडेय यांनी अतिशय कमी कालावधीत कल्पक योजना डिझाईन करून ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल बॅंकेच्या माहिती तंत्रज्ञान चमूचे कौतुक केले.