पुणे – महाराष्ट्र बॅंकेने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. सरकारी बॅंकांमध्ये डिजिटल व्यवहारात महाराष्ट्र बॅंकेने पहिला क्रमांक मिळवला आहे.
नोव्हेंबर महिन्यातील या संदर्भातील आकडेवारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जाहीर केली आहे. या अगोदर ग्रामीण विकास मंत्रालयाने महाराष्ट्र बॅंकेला ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. हा पुरस्कार बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंतकुमार टम्टा यांनी स्वीकारला.
बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र बॅंक भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तंत्रज्ञानात गुंतवणूक करीत आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ विकासही करीत आहे. नागरिकांना सरळ, सोपे, पारदर्शक आणि सुरक्षित डिजीटल व्यवहार करता यावे यासाठी बॅंकेचे प्रयत्न चालू असल्याचे व्यवस्थापकीय संचालक राजीव यांनी सांगितले.