कोयनानगर – कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप (ता. पाटण) येथील अर्जुन शरद कदम (वय 18) हा युवक बेपत्ता झाला होता. मंगळवारी दि. 6 जून रोजी ही घटना घडली होती. दरम्यान, धरणातील गाळ मिश्रित पाण्यात तो अडकला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुषंगाने शोध मोहीम सुरु केल्यावर बेपत्ता युवकाचा मृतदेह कोयना धरणात सापडला आहे. यामुळे गाडखोप गावावर शोककळा पसरली आहे.
अधिक माहिती अशी की, गाडखोप येथील 4-5 युवक मंगळवारी कोयना धरणाच्या उजव्या तीरावर पोहायला गेले होते. धरणात पोहत असताना अचानक अर्जुन कदम पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. याबाबतची माहिती त्याच्यासोबत पोहणाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाच्या मदतीने धरणातील पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले होते. दरम्यान, सायंकाळनंतर अंधार पडल्याने शोध मोहिमेत अडथळा येऊ लागल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली. बुधवारी सकाळी पुन्हा शोध सुरु केला असता अर्जुनचा मृतदेह गाडखोप हद्दीत कोयना धरणाच्या पाण्यात सापडला.