पुणे – महाबळेश्वर येथे खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा मृतदेह आंबेगाव पठार येथे एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. या मृतदेहाचे हात, पाय आणि चेहरा भटक्या श्वानांनी खाल्ला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद केली.
राजेंद्र महादेव जाधव (50, रा. महाबळेश्वर) असे त्याचे नाव आहे. तो महाबळेश्वर येथे घोडा भाड्याने देत होता. घरगुती वादातून 1 सप्टेंबर रोजी त्याने पत्नीचा जाळून खून केला. तेव्हापासून तो फरार होता. भारती विद्यापीठ पोलिसांना आंबेगाव पठार येथे एक मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. त्यावेळी भटक्या श्वानांनी त्या मृतदेहाचे लचके तोडले होते. मृतदेहावरील कपड्यांच्या खिशात पोलिसांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन सापडले. त्यावर नाव असणाऱ्या महाबळेश्वर येथील डॉक्टरांशी पोलिसांनी संपर्क साधला. डॉक्टरांनी तो त्यांचा नियमित रुग्ण असल्याचे सांगितले.
जाधव यांनी महाबळेश्वर येथील एका मित्र मंडळाचे जॅकेट घातले होते. त्या मंडळाशी पोलिसांनी संपर्क साधला असता, त्यांनी त्याच्या मुलाचा नंबर दिला. त्याच्या मुलाशी संपर्क साधला. त्याने रविवारी पुण्यात येऊन वडिलांच्या मृतदेहाची ओळख पटवली.
पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र जाधव याने आठवड्यापूर्वी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. त्यांचा मृतदेह लटकत असलेल्या परिसरात नागरिकांचा वावर कमी आहे. यामुळे भटक्या श्वानांनी मृतदेहाचे लचके तोडले.
महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी सांगितले, “जाधव यांच्या आत्महत्येबाबत पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याची वैद्यकीय कागदपत्रे अजून मिळालेली नाहीत. आम्ही 1 सप्टेंबरपासून जाधव यांचा शोध घेत होतो.