घुसखोरीचा डाव उधळला; पाकिस्तानी दहशतवादी भारतीय लष्कराच्या जाळ्यात

श्रीनगर  – भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत महत्वपूर्ण मोहीम राबवत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. त्यावेळी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात यश आले. तो लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे.

जम्मू-काश्‍मीरच्या उरी क्षेत्रात तैनात असणाऱ्या भारतीय जवानांना एलओसीलगत संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून हाती घेण्यात आलेली मोहीम आठवडाभरापेक्षा अधिक काळ चालली. त्या मोहिमेवेळी सहा दहशतवाद्यांच्या गटाचा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा डाव उधळण्यात आला.

दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर तीन जवान जखमी झाले. त्या मोहिमेचा अधिक तपशील भारतीय लष्कराने मंगळवारी दिला. त्यानुसार, अली बाबर पर्रा या पाकिस्तानी दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या इतर चार साथीदारांनी माघारी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पलायन केले.

घुसखोरीच्या अयशस्वी ठरलेल्या डावामुळे दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उघड झाले. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना एलओसीजवळ पोहचणे शक्‍य नसल्याचे मानले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.