सातारा – सातारा नगरपालिकेच्या करांची कोट्यवधींची थकबाकी अनेकांकडे आहे. करोनामुळे वसुली “लॉकडाऊन’ झाली आहे. सरकारी कार्यालयांनीही गेल्या दोन वर्षांपासून थकबाकी भरली नसल्याने पालिकेची 78 लाखांची वसुली ठप्प झाली आहे. पालिकेच्या उत्पन्नाची गाडी रुळावर आणण्यासाठी ही वसुली गरजेची आहे; परंतु त्याबाबतचे धोरण ठरत नसल्याने वसुली विभागाची अडचण झाली आहे.
विविध शासकीय विभागांकडून 78 लाख 31 हजार रुपयांच्या करांची बाकी पालिकेला येणे असून ते वसूल करण्याचे ठोस धोरण नसल्याने पालिकेच्या सर्वसामान्य फंडावर ताण आला आहे. थकबाकी वसुलीसाठी पालिकेने कारवाईचा इशारा दिला होता; परंतु तेवढ्यात करोनाचा प्रार्दुभाव सुरू झाला अन् देशव्यापी लॉकडाऊन वाढल्याने सगळीच वसुली अडकली आहे. शहरातील मिळकतींची चतुर्थ वार्षिक पाहणी न झाल्याने वाढलेल्या मिळकतींची नोंद झालेली नाही. या मिळकतधारकांकडे लाखो रुपयांच्या करांची थकबाकी आहे.
शहरात थकबाकीदार शासकीय कार्यालयांची संख्याही मोठी आहे. वसुलीसाठी ग्रामपंचायतींवर कारवाई करणाऱ्या जिल्हा परिषदेने चार लाख 89 हजार 197 रुपयांचा कर थकवला आहे. देणी वसूल करण्यासाठी प्रसंगी सातबारावर बोजा चढवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या महसूल विभागाकडे नऊ लाख 32 हजार 538 रुपयांचा कर थकीत आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन विभागाकडे 19 हजार 573, रोहयो कार्यालयाकडे दोन लाख 37 हजार 493, तहसील कार्यालयाकडे सहा लाख सहा हजार 763, तलाठी निवास 23 हजार 64, तहसीलदार धान्य गोडावूनची 45 हजार 645 रुपये थकबाकी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांकडून देखभाल, दुरुस्तीचा खर्च वसूल करूनही सुविधा न देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 21 लाख 20 हजार 426 रुपये थकबाकी आहे.
त्यात बांधकाम भवन 70 हजार 842, कार्यकारी अभियंता कार्यालय 18 लाख 88 हजार 24, सर्किट हाऊस 13 हजार 517, डिस्ट्रिक्ट इंजिनियर पब्लिक वर्क्स कार्यालय 15 हजार 840, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग 92 हजार 549, पश्चिम विभाग व गोडाऊन 10 हजार 154, शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या तक्षशिला व नालंदा या इमारतींची 40 हजार 573 तर दळणवळण कार्यकारी अभियंता बंगल्याची 8 हजार 401 रुपये थकबाकी आहे.
दंडात्मक कारवाईची तत्परता दाखवणाऱ्या सातारा पोलीस विभागाकडे 25 लाख 32 हजार 822 रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये मंगळवार तळे व करंजे पोलीस चौकी, पोलीस रिझर्व्ह क्वाटर्स, पोलीस इन्सपेक्टर क्वाटर्स, सातारा शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, लॉकअप, कारागृह, पोलीस करमणूक केंद्र, पोलीस क्लब, अजिंक्यतारा विश्रामगृह, पोलीस वसाहत, पोलीस अधीक्षक कार्यालय व लॉकअप शेड, वायरलेस पोलीस, पोलीस अधीपक निवासस्थान, उपविभागीय पोलीस अधिकारी निवासस्थान यांचा समावेश आहे. पाणीपट्टी थकबाकीसाठी शेतकऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सातारा उपविभागीय पाटबंधारे कार्यालयाचे 66 हजार 95 रुपये थकले आहेत.
वन विभाग एक लाख 12 हजार 73, जिल्हा व सत्र न्यायालय एक लाख 99 हजार 169, भारत संचार निगम लिमिटेड एक लाख 14 हजार 147, सहाय्यक निबंधक मुद्रांक अधिकारी कार्यालय दोन लाख 18 हजार 127, टपाल कार्यालय चार लाख 12 हजार 612, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तीन हजार 464 रुपये, सिव्हील हॉस्पिटल मलेरिया ऑफिस एक लाख 14 हजार 794, समता शिक्षण प्रसारक संस्थेचे मूकबधीर विद्यालय तीन लाख 56 हजार 883, प्रतापसिंह हायस्कूल 21 हजार 112, मागासवर्गीय मुलामुलींची शासकीय वसतिगृहे 73 हजार 619 रुपये, जिल्हा कोषागार कार्यालय 15 हजार 294 रुपये, अशी विविध विभागांची थकबाकी आहे.
सरकारी विभागांमध्ये दिव्याखाली अंधार
जिल्हा प्रशासनात आदर्श कारभाराचा टेंभा मिरवणाऱ्या बहुतेक विभागांमध्ये दिव्याखाली अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय विभागांनी कर थकवला असताना पालिका मात्र सर्वसामान्यांच्या मागे वसुली व कारवाईचा ससेमिरा लावला जातो. पालिकेची उत्पन्नाची साधने कमी असताना प्रशासनातील मलईदार विभाग कोट्यवधींची थकबाकी ठेवत असल्याचेच सर्वसामान्यांना आश्चर्य वाटते. पालिकेने सरकारी विभागांकडून थकबाकी वसूल करावी, अशी मागणी होत आहे.