मान्सूनची वाटचाल जोमाने; पूर्वमोसमी पावसाचे राज्यभरात धुमशान

पुणे – मान्सूनने मोठी प्रगती करत संपूर्ण केरळ राज्य व्यापले असून त्याची आगेकूच सुरू आहे. अशाच पद्धतीने जर मान्सूनची वाटचाल राहिली, तर येत्या गुरुवारपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मोसमी पाऊस पोहोचण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला असून विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विविध भागात मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. मुंबईत सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळी अनेक भागात ढगाळ वातावरण होते. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्ये सायंकाळी जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या धरण परिसरातही चांगल्या सरी कोसळल्या. सातारा जिल्ह्यातही झालेल्या धरण परिसरात चांगला पाऊस झाला. या पावसाने ओढे-नाले भरुन वाहिले तर ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.

सांगली-मिरजेसह जिल्ह्यातील पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्‍यांत पावसासह गारा पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात चिपळूणसह खेड, दापोली, गुहागर आणि संगमेश्‍वर तालुक्‍यात झालेल्या पावसाने धुळपेरण्या केलेल्या बळिराजाला दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.