हंगामी कर्मचाऱ्यांची दबंगगिरी
पुणे – अतिक्रमण विभागात हंगामी तत्त्वावर भरलेल्या अतिरिक्त निरीक्षकांनी अतिक्रमण कारवाई करताना दबंगगिरीच आरंभली असून या व्यावसायिकांनी अक्षरश: “भीक नको पण कुत्रे आवर’ अशी मागणी केली आहे.
अतिक्रमण नियंत्रण विभागातर्फे शहरात कारवाईला सुरुवात केली आहे. अतिक्रमण निरीक्षक पदासाठी हंगामी म्हणून 6 महिन्यांसाठी नव्याने 42 जणांची भरती केली आहे. या हंगामी निरीक्षकांची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. अगदी रविवारीही या निरीक्षकांनी कारवाई सुरू ठेवली असून कारवाईपेक्षा वाद घालण्यातच या कर्मचाऱ्यांचा हातखंडा असल्याचे दिसून येत आहे.
कारवाई करताना व्यावसायिकांचा विरोध होतोच. परंतु, परिस्थिती योग्य तऱ्हेने, सावधगिरीने आणि सामंजस्याने हाताळण्यापेक्षा दबंगगिरीचा वापरच याठिकाणी केला जात आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटत असून व्यावसायिकांचा रोष यामुळे बाहेर येत आहे.
बोपोडी येथील अतिक्रमण कारवाई दरम्यान महापालिकेतील हे हंगामी कर्मचारी अनधिकृत हातगाडीवर कारवाई करत असताना त्यांना व्यावसायिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी वादही झाले; परंतु बंदोबस्तासाठी दिलेले पोलीस सक्षम नाहीत असे खापर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांवर फोडले. मात्र, यामध्ये कर्मचाऱ्यांचा असमंजसपणा कारणीभूत आहे, याचा विचार केला गेला नाही.
अतिक्रमण निरीक्षकाची 160 पदे रिक्त
महापालिकेतील अतिक्रमण नियंत्रण विभागातील अतिक्रमण निरीक्षकाची 160 पदे रिक्त असल्याने हंगामी पद्धतीने 6 महिन्यांसाठी निरीक्षकांची भरती करावी लागत आहे. सध्या 14 निरीक्षकांवर अतिक्रमणाचा गाडा चालत असून 42 जणांची हंगामी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. अतिक्रमण निरीक्षकांच्या 174 जागांपैकी 14 च जागा भरल्या आहेत. त्यातील दोनजण निलंबित असून त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी सुरू आहे.