नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेस पक्षाला आणखी एक हादरा बसला आहे. पक्षाच्या बँक खात्यांच्या विरोधात आयकर विभागाकडून सुरू करण्यात आलेली कारवाई रोखली जाण्याची मागणी करणारी पक्षाची याचिका आयकर अपीलीय लवादाने फेटाळली आहे.
पक्षाच्या खात्यातून ६५ कोटी रूपये काढल्याचा आरोप कॉंग्रेसने आयकर विभागावर केला होता. कॉंग्रेसची ११५ कोटींची कराची थकबाकी आहे. कर परताव्याचे हे प्रकरण प्रलंबित असल्याचा कॉंग्रेस पक्षाचा दावा होता. तसेच आयटी विभागाने लोकशाहीबाह्य पध्दतीने आमच्या खात्यातील पैसे काढले असल्याचाही पक्षाचा आरोप आहे.
आज याचिका फेटाळण्यात आल्यानंतर कॉंग्रेसचे वकील विवेक तन्खा यांनी लवादाच्या आदेशाला दहा दिवसांची स्थगिती दिली जावी अशी मागणी केली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार पक्षाकडून आता उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली जाणार आहे.
कॉंग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आल्याचा आरोप पक्षाचे नेते अजय माकन यांनी १६ फेब्रुवारी रोजी केला होता. इन्कम टॅक्स विभागाने कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेसकडून २१० कोटी रूपयांच्या थकबाकी वसुलीची मागणी केल्याचे त्यांनी म्हटले होते.
त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही तासांतच इन्कम टॅक्स लवादाने कॉंग्रेसच्या खात्यांवरची स्थगिती उठवल्याचे म्हटले होते तर पक्षाकडून जारी करण्यात आलेले धनादेश अर्थात चेक बँकांनी रोखले असल्याची माहिती आम्हाला १४ फेब्रुवारीला समजली. ते आमचे चेक पास करत नसून क्राउड फंडिंगची खातीही गोठवली असल्याची माहिती माकन यांनी दिली होती.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार राजकीय हेतूंनी प्रेरीत असून हा आर्थिक दहशतवाद असल्याचा आरोप कॉंग्रेसने भारतीय जनता पार्टीवर केला आहे. विरोधी पक्षाला पंगू करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.