Lok Sabha Election 2024 । कॉंग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जारी केली. त्यामध्ये राहुल गांधी, शशी थरूर, के.सी.वेणुगोपाल या प्रमुख नेत्यांना स्थान मिळाले आहे. राहुल केरळच्या वायनाडमधून पुन्हा मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे, छत्तिसगढचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
कॉंग्रेसने ८ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये केरळमधील सर्वांधिक १६ उमेदवारांचा समावेश आहे. केरळच्या थिरूवनंतपूरममधून हाय-प्रोफाईल नेते थरूर पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील. त्या राज्यातील अलाप्पुझामधून पक्षाचे सरचिटणीस वेणुगोपाल नशीब आजमावतील.
केरळपाठोपाठ कॉंग्रेसने कर्नाटकमधील ७ उमेदवार जाहीर केले. त्या राज्यातील पक्षाचे एकमेव खासदार डी.के.सुरेश हे त्या यादीतील ठळक नाव आहे. उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचे बंधू असणारे सुरेश बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवतील.
कॉंग्रेसने छत्तिसगढमधील ६ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामध्ये बघेल यांचे नाव विशेष ठरले आहे. ते राजनांदगावमधून लढतील. तेलंगणातील ४ उमेदवार पक्षाने जाहीर केले. त्याशिवाय, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि लक्षद्वीपमधील उमेदवारांचा समावेश कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत करण्यात आला आहे.