सातारा -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एक हजार कार्यकर्ते व हितचिंतकांनी रक्तदान केले. प्रारंभी बुधवारी सकाळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात पक्ष ध्वजारोहण करण्यात आले.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनामित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. विशेष म्हणजे साताऱ्यामध्ये श्रीमती दीपाली क्षीरसागर या महिलेने सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान केले. या रक्तदातीचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असल्याने मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शारीरिक अंतर राखून राष्ट्रवादी भवनच्या प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्या कार्यकर्त्यांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात येत होता.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, स्वप्नील डोंबे, शफिक शेख, निवास शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खास व्यवस्था केली होती. सातारा शहरात शंभर ते सव्वाशे युवकांनी रक्तदान केले. आमदार शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर प्रथमच ते जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने अनेक युवकांनी त्यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
राष्ट्रवादी भवनमध्ये जल्लोषाचे वातावरण अनुभवायला मिळाले. कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे तसेच साताऱ्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, मारूती इदाटे, सौ.समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, सेवादल अध्यक्ष राजेंद्र लावंघरे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आभार मानले.