गडचिरोली – गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची सशस्त्र नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री जाळपोळ करुन दोन वनरक्षकांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात भिती व दहशतीचे वातावरण आहे.
तेंदू हंगामामुळे गडचिरोलीत सध्या तेंदू कंत्राटदाराचा राबता आहे. गेल्या आठवड्यात गडचिरोली पोलिसांनी नक्षलींना तेंदू कंत्राटदाराकडून पोहचणारी दोन कोटी पेक्षा अधिकची रसद पकडली होती. त्यानंतर तेंदूपत्ता कंत्राटदाराच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली. यासर्व प्रकारामुळे मंगळवारी रात्री 10 ते 15 सशस्त्र नक्षलवादी वनपरिक्षेत्र कार्यालयात गेले. त्यांनी दोन वनरक्षकांना दमदाटी करुन कार्यालयातील काही कागदपत्रे व फर्निचरला आग लावली. त्यानंतर नक्षली दोघांनाही मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल घेऊन गेले.
विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी नक्षलींनी हे वनपरिक्षेत्र कार्यालय जाळले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा ते जाळण्यात आले. वन विभागाच्या कामांना विरोध म्हणून ही घटना केल्याचे बोलले जात आहे. नक्षलींच्या गट्टा जांबिया दलमकडून हा प्रकार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.