कार्तिकीनिमित्त आळंदीत वैष्णवांची मांदियाळी : वातावरण भक्तिमय
आळंदी – एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ।।
धन्य भागिरथी
मनकर्णिका वोघा ।
आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ।।
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।
मिळाले ते सांग आलंकापुरी ।।
नामा म्हणे धन्य
भाग्याचे हे संत ।
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ।।
संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आळंदीत भाविकांची संख्या आता वाढत आहे. रविवार (दि. 20) कार्तिकी एकादशी आळंदी यात्रा तर मंगळवार (दि. 22) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे.
माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी संत आणि देवाचे पालखी सोहळे आता अलंकापुरीत पोहोचले असून भाविक वारकरी भजन, कीर्तन श्रावणाचा आनंद घेत आहेत. शहरातील प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजलेला दिसत आहे. तसेच इंद्रायणी घाटावरदेखील भाविकांची संख्या वाढलेली दिसत आहे.
मंदिरात होणारे कार्यक्रम
कार्तिक वद्य दशमी शनिवारी (दि. 19) पहाटे 3ते 5 पवमान अभिषेक व महापूजा. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12. 30 ते 1 महानैवेद्य. दुपारी 4.30 ते 6.30 हभप गंगुकाका शिरवळकर यांच्यावतीने वीणा मंडपात कीर्तन. सायंकाळी 6.30 ते 8.30 श्री धोंडोपंत दादा अत्रे यांच्या वतीने कीर्तन. रात्री 8.30 ते 9 धुपारती. रात्री 9 ते 11 हभप वासकर महाराज यांच्या वतीने कीर्तन. रात्री 11.30 ते 12.30 हभप वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागर.
इंद्रायणी घाटावर विविध कार्यक्रम
इंद्रायणी घाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. याठिकाणी मोठ्या पडद्यावर कार्यक्रम दाखविले जातात त्यामुळे भाविक विशेषतः सायंकाळी आणि रात्री येथे भजन, कीर्तन श्रावणाचा आनंद घेत असतात.
मंदिर सजावटीला वेग
माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त मंदिर सजावटीला वेग आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच झेंडूच्या फुलांनी मंदिर सजवण्याचे काम सुरू होते. प्रमुख झेंडू फुलांसह इतरही आकर्षक फुलांचा वापर करून मंदिर सजवण्यात येत आहे. मंदिरात परंपरेचे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
दर्शनबारी इंद्रायणी पलीकडे
आळंदीत आता भाविकांची संख्या वाढत असून दर्शनरांग मंदिराच्या बाहेर इंद्रायणी पलीकडे पोहोचली आहे. दर्शनासाठी 7 तास वेळ लागत असल्याचे भाविकांनी सांगितले. पवित्र इंद्रायणी तीर्थात स्नान करून भाविक माऊलींचे दर्शन घेत आहेत. दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे पाणी, प्रसाद, आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. मुख्य यात्रा एकादशी दिवशी ही दर्शन रांग देहूफाट पर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे.
ठिकठिकाणी भाविकांना आरोग्यसेवा
आळंदी ग्रामीण रुग्णालयामार्फत भाविकांना मोफत आरोग्यसेवा देण्यात येत आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी आरोग्य सेवा बूथ तयार करण्यात आले आहेत तसेच फिरत्या व्हॅनमधून देखील भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने योग्य नियोजन करून आवश्यक औषधे भाविकांना देण्यात येत आहेत.
भाविकांनी घेतला फुगडीचा आनंद
समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक आले आहेत. चार ते पाच दिवस राहण्याचे नियोजन करून आलेले भाविक आळंदीतील विविध धार्मिक ठिकाणांना भेट देऊन दर्शन घेत आहेत. यावेळी वडगाव रस्त्यावरील ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांगदेव यांच्या भेटीचे ठिकाण विश्रांतवड याठिकाणी भाविक महिला-पुरुष फुगडी खेळण्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळाले.