व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करीत वर्षभर बलात्कार केला

चिन्मयानंद प्रकरणातील पीडितेने पोलिसांना तपशीलवारपणे ऐकवली कैफियत
नवी दिल्ली: भाजपचे माजी केंद्रीय मंत्री चिन्मनयानंद यांनी आपले आंघोळ करतानाचे व्हिडीओ चित्रीत करून ते व्हायरल करण्याची धमकी देत आपल्यावर वर्षभर बलात्कार केल्याची कैफियत विधी महाविद्यालयाच्या पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ऐकवली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या निवेदनात चिन्मयानंद प्रकरणाची सारी कहाणी इत्थंभूतपणे सांगितली असून त्याचा काही तपशील आज माध्यमांना मिळाला आहे. दरम्यान चिन्मनयानंद यांच्या विरोधात अजून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवलेला नाही. उत्तरप्रदेश पोलिसांकडून या प्रकरणात जाणिवपुर्वक विलंब केला जात असल्याचीहीं या मुलीची तक्रार आहे.

या मुलीने आपल्या जबाबात सांगितले की, लॉ कॉलेजच्या ऍडमिशन साठी आपण प्रथम गेल्या वर्षी जून महिन्यात चिन्मयानंद यांना भेटलो. चिन्मयानंद यांच्या आश्रमातर्फे विधी महाविद्यालयासह अन्य अनेक शैक्षणिक संस्था चालवल्या जातात. चिन्मयानंद यांनी आपल्याला प्रवेश मिळवून दिला पण त्यावेळी त्यांनी माझ्याकडून माझा फोन नंबर घेतला. त्यानंतर त्यांचे मला सतत फोन येत गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी मला त्यांच्याकडे बोलावून त्यांच्या कॉलेज लायब्ररीत पाच हजार रूपयांची नोकरीही ऑफर केली. आपण गरीब परिवरातील असल्याने ही नोकरी करत आपण शिक्षण घेत होतो. नंतर चिन्मयानंद यांनी आपल्याला त्यांच्या कॉलेजातील महिला हॉस्टेल मध्ये राहायला येण्याची सुचना केली. त्यानंतर ते मला त्यांच्या आश्रमात बोलवायचे. हॉस्टेल मध्ये असताना मी आंघोळ करीत असतानाचा माझा एक व्हिडीओ त्यांनी गुप्तपणे चित्रीत केला. नंतर त्यांनी मला तो व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करीत माझ्यावर अत्याचार करणे सुरू केले.

ते माझ्यावर बलात्कार करीत असतानाही त्याचा व्हिडीओ काढला गेला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी माझ्यावर सातत्याने अत्याचार सुरूच ठेवला. काही वेळा बंदुकीच्या धाकानेही हा प्रकार केला गेला. त्यांनी मला धमकाऊन माझ्याकडून काही फोन मेसेजही पाठवायला भाग पाडले. गेल्या जुलै पर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांचा एक व्हिडीओ मी सोशल मिडीयावर शेअर करून मी शहाजहानपुर येथून राजस्थानला पळून गेले असे या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांना तिने बारा पानी निवेदन दिले असून त्यात सारा तपशील तिने सादर केला आहे. चिन्मयानंद यांनी काढलेले काही व्हिडीओही तिने पोलिसांना सादर केले आहेत.

शहाजहानपुर येथून ही मुलगी घाबरून पळून गेल्यानंतर या प्रकरणाचा मोठा गवगवा स्थानिक पातळीवर झाला पण चिन्मयानंद यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेशातील काही वकिलांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाला एक निवेदन पाठवून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेच सुमोटो कारवाई करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने याची दखल घेत संबंधीत मुलीची कैफियत ऐकून घेतली आहे. या प्रकरणात आता एसआयटी नेमून चौकशी करण्याचा आदेश त्यांनी उत्तरप्रदेश सरकारला केला आहे.

या मुलीची तक्रार शहाजहानपुर पोलिसांनी घेतली नाही म्हणून तिने दिल्ली पोलिसांकडे रितसर बलात्काराची लेखी तक्रार दिली आहे. दिल्ली पोलिसांनी तिची तक्रार पुन्हा पुढील तपासासाठी शहाजहानपुर पोलिसांकडे पाठवली आहे. चिन्मयानंद हे तीन वेळा उत्तरप्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. सन 2011 मध्येही एका मुलीने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)