पुढच्या वर्षी लवकर या!

पुणे – “बाप्पा हळू हळू चाला, वाटे मोरया बोला’, तसेच “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा उद्‌घोष करत गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे पूजलेल्या गणरायाला गुरूवारी निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, सकाळी 9ः30 वाजता महात्मा फुले मंडईजवळील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ महापौर मुक्‍ता टिळक यांच्या हस्ते आरती होऊन मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.

परंपरेप्रमाणे अकराव्या दिवशी या लाडक्‍या बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यात येतो. त्यासाठी शहरातील मंडळे सज्ज झाली असून, सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्तीविसर्जनाला सुरूवात होणार आहे. तसेच मानाच्या गणपतींच्याही विसर्जन मिरवणुकीची तयारीही पूर्ण झाली आहे.

गणेशाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी विविध मंडळांनी तयार केलेल्या रथांचे काम बुधवारी रात्री पूर्ण झाले. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन गुरूवारी मोठ्या उत्साहात होणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या मुख्य मार्गांवरील गणेश मंडळांनी रस्ता मोकळा करून देण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच मंडप उतरवण्याला सुरूवात केली होती. त्यामुळे विसर्जन मार्गांवरील बहुतांश अडथळे दूर झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.