पुणे – घटस्फोटित पत्नीने पतीवर काळी जादू व करणी केली असून त्यामुळे त्याचा मृत्यु होवू शकतो, अशी भीती दाखवून दोन भोंदुबाबांनी काळया जादूवर उपचार करण्यासाठी सहा लाख 80 हजार रुपयांची रक्कम कबुतरे खरेदी करण्यासाठी कोंढवात राहणारे एका कुटुंबाकडून घेतली. याप्रकरणात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल न करता फिर्यादीला सेटलमेंट करण्यास भाग पाडले होते. सेटलमेंट करुन तीन लाख रुपये कुटूंबाला मिळवून दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र उर्वरीत पैसे परत न मिळाल्याने फिर्यादीने अंधश्रध्दा निर्मुलन समितीकडे (अंनिस) दाद मागितली. यानंतर अनिसने पुढाकार घेत कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात कुतुबुद्दीन नजमी (रा.कोंढवा,पुणे) व हकिमुद्दीनराज मालेगावंवाला (रा.कोंढवा खुर्द ,पुणे) या आरोपींवर जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अबिझर जुझर फतेपुरवाला (36,रा.कोंढवा बु,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे 2010 मध्ये गुजरात मधील लुनवाडा येथील शमिना (नाव बदलले) नावाचे मुलीसोबत लग्न झाले होते. परंतु पत्नीपासून मूल होत नसल्याने त्यांचे 2017 मध्ये त्यांचा दोन्ही कुटुंबाचे संमतीने घटस्फोट झाला होता. चार महिन्यापूर्वी हुझेफा हा तापाच्या कारणामुळे आजारी पडला होता. त्याला कोरोना झाले असेल या शंकेने कुटुंबाने त्याची चाचणी करुन घेतली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर वानवडीतील एका क्लिनीक मध्ये त्यावर किडनीचे उपचार करुन तपासणी करण्यात आली. पण त्याचे अहवाल ही निगेटिव्ह आले. परंतु त्याचा त्रास कमी होत नव्हता आणि त्याचे जेवण, पाणी पिणे खुप कमी होते, त्यास वारंवार चक्कर येत होती. त्यामुळे कुटुंबियांनी दुसऱ्या रुग्णालयात त्याचे तपासण्या केले असतानाही त्याला नेमका त्रास कशाने होतो समजुन येत नव्हते.
डॉक्टरांनी त्याचे गोळया बंद करण्याचा सल्ला दिला होता. दि. 25/11/2020 रोजी हुझेफा याची आई व अबिझरा यांची पत्नी या धर्मगुरु सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठिक होण्याकरिता अल्लाकडे प्रार्थना करण्याची विनंती करण्याबाबत अर्ज देण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे हकिमउद्दीन मालेगाववाला भेटला. त्यास हुझेफाचे आजारपणाबाबत सांगितले असता त्याने मी तुमचे घरी येऊन मुलास पाहतो असे म्हणाला.
त्याप्रमाणे हकिमउद्दीन एका माणसाला घेऊन हुझेफा याचे घरी गेला. त्यावेळी त्याने मांत्रिक उपचार करुन हुझेफा याचे पत्नीचा फोटो पाहण्यास मागून तो पाहत त्याने दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना भेटण्यास बोलवले. हुझेफाचे पत्नीने त्याचेवर काळी जादू केल्याचे सांगितले व त्यामुळे त्यास त्रास होत असल्याचे म्हणाला. तो मरणाचे दारात असून त्याचा कधी मृत्यु होऊ शकतो असे सांगुन घरातील आणखी दोन लोकांना काळया जादुचा त्रास होऊ शकतो असे सांगितले.
त्यावर उपचार करण्याकरिता त्याने मुंबईत सैफी, महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील, ती कबुतरे काळी जादूची बला त्यांचे अंगावर घेतात, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही असे सांगत चार कबुतरे खरेदी करण्यास सहा लाख 80 हजार रुपये मागितले. त्यामुळे हुझेफाचे वडिलांचे बॅंक खात्यातून पैसे काढून देण्यात आले.
फिर्यादीने डिसेंबर 2020 मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तेव्हा कोंढवा पोलिसांनी हा गुन्हा तातडीने नोंद करुन घेणे आवश्यक होते. मात्र कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने फिर्यादीला आरोपीसोबत सेटलमेंट करण्यास भाग पाडले. त्यांना आरोपीकडून तीन लाख रुपये मिळवून दिले. मात्र उर्वरीत रक्कम मिळवून दिली नाही तसेच गुन्हाही दाखल केला नाही. यामुळे फिर्यादीने अनिसकडे दाद मागितली
अंनिस कार्यकर्त्या नंदिनी जाधव व मिलिंद देशमुख यांनी याप्रकरणात लक्ष्य घालून कोंढवा पोलीसांना आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
तपास पथकाचेच कॉल रेकॉर्ड तपासा
जादू टोणा कायद्याअंतर्गत कोंढवा पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र तपास अधिकारीच आरोपीला मिळालेले असतील तर फिर्यादीला न्याय कसा मिळणार. पोलिसांनी कायद्याची व्यवस्थीत अंमलबजावणी करायला हवी. कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास सर्व काही उघड होईल
– नंदिनी जाधव (अंनिस कार्यकर्त्या)