मुंबई – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. राज्यात पहिल्या लाटेतून सुरक्षित राहिलेल्या लहान मुलांवर करोना संसर्गाने दुसऱ्या लाटेत हल्ला चढवला. त्यातच तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या लाटेत करोनाची लागण झालेल्या मुलांची अवस्था बिघडत असल्याचं चित्र आहे.
राज्यात ४ ते १६ वयोगटातील मुलांना ब्लॅक फंगसची लागण होत असल्याचे समोर आलं आहे. मुंबईतच तीन लहान मुलांचे ब्लॅक फंगसमुळे डोळे काढावे लागले आहेत. यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
फोर्टिस रुग्णालायचे डॉ. जेसल शाह यांनी सांगितलं, करोनातून बऱ्या झालेल्या मुलांमध्ये ब्लॅक फंगस दिसून येत आहे. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या दोन मुलींमध्ये ब्लॅक फंगस आढळला. 48 तासांतच त्यांचा एक डोळा काळा पडला. त्यांचं नाक, डोळे आणि सायनसमध्ये ब्लॅक फंगस पसरला होता. सुदैवाने ब्लॅक फंगसचा परिणाम मेंदूपर्यंत झाला नव्हता. सहा आठवडे उपचार केल्यानंतर त्यांचा एक डोळा आम्हाला काढावा लागल्याचं ते म्हणाले.
या व्यतिरिक्त १४ आणि १६ वर्षांच्या मुलींमध्ये ब्लॅक फंगस आढळून आला होता. त्यांना करोनानंतर मधुमेह झाल्याचं समोर आलं. अखेरीच उपचारदरम्यान ब्लॅक फंगसमुळे १४ वर्षांच्या मुलीचा एक डोळा काढण्यात आला, असं डोळे आणि कॅन्सर सर्जन डॉ. पृथेश शेट्टी यांनी सांगितलं.